Wednesday, August 29, 2007

तो रस्त्याच्या कडेला पडला होता

तो रस्त्याच्या कडेला पडला होता
उंची ५-४
वर्ण काळाशार

केस अर्धपिकलेले
वय वार्धक्याकडे झुकलेले

अंगावरचे निळे जर्किन विटलेले
काळी पँट पांढरा शर्ट जरासे फाटलेले

सकाळपासुन पाउस धो-धो कोसळत होता
रस्त्याकडेने पाण्याचा प्रवाह उसळत होता

सायकलवरुन तो कामाला चालला होता
हँन्डलला एक टिफीन अडकवला होता

अचानक मृत्यु त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता

चार बघे मग गोळा झाले
पहाता पहाता सोळा झाले

काही मौलिक चर्चा झडल्या
नजरा विचारात अन गढल्या

एक जण त्याचि बघतोय नाडी
एक जण जवळचा कांदाच फोडी

बहुतेकांना घाई कामावर जायची
पेंडींग कामे एकदाचि उरकायची

असेल भले तो मरायला टेकला
हे लचांड आपल्या मागे कशाला

तो अभागी निपचित पडुन होता
कोंडाळ्यातच गर्दीच्या दडुन होता

गर्दीचा उत्साह मावळु लागला होता
आँफिसमधला लेटमार्क दिसु लागला होता

एकएक जण घड्याळाकडे बघत पाय काढु लागला
सद्सद् विवेक बुद्धीला काहीना-काही समर्थन देऊ लागला

पहाता पहाता सारे निघुन गेले
रहाटगाडग्यात बुडुन गेले

पाऊस त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता


एकाकी
बाकी